आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर देशात दुसऱ्या क्रमांकावर
- by Yogesh Bandagale
- January 04, 2026
- 383 views
‘दूर दे हंड्रेड २०२५’ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा
चिपळूणच्या ४ रायडर्सना ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कार
चिपळूण : दमदार सहनशक्ती, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट सायकलिंग कौशल्याच्या जोरावर चिपळूण शहरातील सायकलपटूंनी ‘दूर दे हंड्रेड 2025’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत चिपळूण सायकलिंग क्लबच्या चार रायडर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा पुरस्कार मिळवला असून तीन रायडर्सना प्लॅटिनम अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. ही 100 दिवसांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 13 सप्टेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये पार पडली.
देश-विदेशातील तब्बल 1077 अनुभवी सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. कठीण ट्रॅक, वेळेचे कडक बंधन आणि शारीरिक सहनशक्तीची कसोटी असलेल्या या स्पर्धेत 25 हजारांहून अधिक पॉईंट्स मिळवणाऱ्या स्पर्धकांना ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कार देण्यात येतो. या स्पर्धेत आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांनी 100 दिवसांत 10,382 किलोमीटर सायकलिंग करत 92,493 मीटर उंचीचे एलेवेशन पार केले आणि 39,611 पॉईंट्स मिळवत देशात दुसरा क्रमांक तसेच 40 ते 49 वयोगटात दुसरा क्रमांक पटकावून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ अवॉर्ड मिळवला.
एस. आर. श्रीकांत जोशी यांनी 100 दिवसांत 10,002 किलोमीटर सायकलिंग करून 76,056 मीटर एलेवेशन पार करत 38,637 पॉईंट्स मिळवले व देशात चौथा क्रमांक तसेच 50 ते 59 वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्काराचे मानकरी ठरले. एस. आर. अंकुश जंगम यांनी 99 दिवसांत 10,022 किलोमीटर सायकलिंग करत 86,000 मीटर एलेवेशन पूर्ण केले व 37,792 पॉईंट्स मिळवत देशात पाचवा क्रमांक तसेच 30 ते 40 वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ अवॉर्ड मिळवला. मलखांबपट्टू एस. आर. हेमंत भोसले यांनी 98 दिवसांत 9,490 किलोमीटर सायकलिंग करून 77,455 मीटर एलेवेशन पार केले व 36,512 पॉईंट्स मिळवत देशात सहावा क्रमांक तसेच 40 ते 49 वयोगटात तिसरा क्रमांक मिळवून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चे मानकरी ठरले. याच स्पर्धेत डॉ. एस. आर. सचिन खेडेकर यांनी 85 दिवसांत 3,880 किलोमीटर सायकलिंग करत 25,217 मीटर एलेवेशन पार करून 18,916 पॉईंट्स मिळवत देशात 136 वा क्रमांक व वयोगटात पाचवा क्रमांक मिळवून प्लॅटिनम अवॉर्ड मिळवला.
तसेच आशिष आयरे यांनी 91 दिवसांत 4,180 किलोमीटर सायकलिंग करून 30,391 मीटर एलेवेशन पार करत 17,495 पॉईंट्स मिळवत देशात 159 वा क्रमांक व वयोगटात आठवा क्रमांक मिळवून प्लॅटिनम अवॉर्ड पटकावला, तर अद्वैत केळकर यांनी 95 दिवसांत 3,420 किलोमीटर सायकलिंग करून 29,269 मीटर एलेवेशन पार करत 16,624 पॉईंट्स मिळवून प्लॅटिनम अवॉर्ड मिळवला. या सर्व रायडर्सनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये ठरवलेल्या वेळेत 100 दिवस सायकलिंग पूर्ण करून पदके आणि सन्मान मिळवले. या यशामागे सातत्यपूर्ण सराव, कठोर शिस्त आणि सायकलिंगप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची ठरली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे चिपळूण शहर आणि चिपळूण सायकलिंग क्लबचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले असून भविष्यात अधिक तरुण सायकलपटूंना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. या यशाबद्दल चिपळूण–संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
