शेखर निकम यांना मंत्रिपदाची संधी?
- by Yogesh Bandagale
- December 18, 2025
- 3361 views
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर जावे लागल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली. त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून बाहेर पडावे लागल्याने मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील आमदार शेखर निकम यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अत्यंत प्रामाणिक, निष्कलंक प्रतिमा असलेले आणि २४ तास कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणारे आमदार शेखर निकम यांना मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी चिपळूण–संगमेश्वर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गुरुवारी चिपळूण येथे राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आटोपल्यानंतर, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाम घोषणा केल्यानंतर आमदार शेखर निकम हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या या अचानक मुंबई दौऱ्यामुळे मंत्रिपदाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
आमदार शेखर निकम हे संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. २०१९च्या निवडणुकीनंतर खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. त्या वेळी आमदार शेखर निकम हे वरिष्ठ आणि अधिक अनुभवी असतानाही त्यांना डावलण्यात आले, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. २०२४च्या निवडणुकीनंतरही आदिती तटकरे यांनाच पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आणि अडीच वर्षांनंतर आमदार शेखर निकम यांना संधी दिली जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.
आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागल्याने निर्माण झालेल्या रिक्त जागेवर आमदार शेखर निकम यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. केवळ आपल्या मतदार संघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण कोकणाचा विचार करून विकासासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार शेखर निकम यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी देऊन कोकणासाठी प्रभावीपणे काम करण्याची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
