धाराशिवात ‘नो मोबाईल-नो टीव्ही’ उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी दररोज २ तास अभ्यासाची घंटा
- by Yogesh Bandagale
- April 05, 2026
- 153 views
धाराशिव : टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत दररोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत दोन तास टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तब्बल ७६० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. या वेळेची सूचना देण्यासाठी गावांमध्ये भोंगा वाजवण्यात येणार असून तो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची ‘अलार्म बेल’ ठरणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावासाठी एक अधिकारी दत्तक देण्यात येणार आहे. तसेच शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे विशेष पथक या दोन तासांत गावात गस्त घालून प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. घरोघरी जाऊन टीव्ही बंद आहेत का आणि विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे.
याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सेमी इंग्लिश पॅटर्न सुरू करण्यात येणार असून वाचन संस्कृती वाढावी यासाठी विशेष वाचन मोहीम राबवली जाणार आहे.
या उपक्रमाला जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन तास टीव्हीपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी घराघरातील टीव्ही बंद ठेवण्याच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
