अटल सेतू परिसरात ‘मुंबई ३.०’ उभारणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई – ‘मुंबई ३.०’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे एकूण ४९० किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यात खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबवण्यात येणार असून हडपसर ते लोणी-काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली. तसेच मुंबईसाठीही विविध विकास प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईसाठी महत्त्वाच्या घोषणा

  • मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

  • वडाळा येथे १३० एकर जागेवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारणार.

  • मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे ते तलासरी या तीन स्थानकांचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार.

  • विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकांभोवतीच्या परिसराचा विकास आराखडा तयार करणार.

  • अटल सेतू परिसरात ‘मुंबई ३.०’ उभारणार.

  • कर्नाळा – साई – चिरनेर, रायगड – पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर ग्रीनफील्ड विकास केंद्र म्हणून विकसित करणार.

शहरी विकासासाठी दीर्घकालीन आराखडा

  • २०४७ पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या ७० टक्के करण्याचे लक्ष्य.

  • राज्याच्या सकल उत्पन्नात शहरांचे योगदान ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न.

  • १० पेक्षा अधिक सक्षम प्रादेशिक प्राधिकरणे स्थापन करणार.

  • ५० पेक्षा अधिक सुनियोजित शहर समूह विकसित करणार.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा १०० टक्के डिजिटल करण्याचा निर्णय.

या घोषणांमुळे मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील शहरी विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

संबंधित लेख