‘सुसंस्कृत गिधाड’ नाटकाने जिंकली मने
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 120 views
रत्नागिरी, दि. २३ (जिमाका) : वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पक्षी मित्र संमेलन २०२६’ ला निसर्गप्रेमी आणि पक्षी मित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांनी संमेलनात प्रबोधनात्मक वातावरण निर्माण केले. विशेष आकर्षण ठरले ते गिधाड संवर्धनावर आधारित ‘सुसंस्कृत गिधाड’ या संगीत नाटकाचे सादरीकरण.
? गिधाड : निसर्गाचा खरा स्वच्छता दूत
वन्यवाणी फाऊंडेशन प्रस्तुत आणि कुणिका बनसोडे-सावंत निर्मित ‘सुसंस्कृत गिधाड’ या नाटकाने गिधाडांचे पर्यावरणीय महत्त्व प्रभावीपणे मांडले. लेखक मकरंद भास्कर सावंत यांनी रामायणातील जटायूचा संदर्भ देत गिधाड हे केवळ मृत प्राण्यांवर उपजीविका करणारे आणि पर्यावरणाचे ‘स्वच्छता दूत’ असल्याचा संदेश दिला. डायक्लोफिनॅक औषधाच्या वापरामुळे गिधाडांची घटती संख्या हा गंभीर मुद्दाही नाटकातून अधोरेखित करण्यात आला.
? मार्मिक भाष्य आणि टाळ्यांचा कडकडाट
नाटकात निसर्ग संवर्धनाबरोबरच मानवी प्रवृत्ती, मूळ स्वभाव आणि प्रलंबित कामांवर मिश्किल शैलीत भाष्य करण्यात आले.
“आलिकडे ये, याला पलीकडे ने माणसा… हा संवर्धनाचा वारसा”
या संदेशाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. कलाकारांच्या कसदार अभिनयाला उपस्थितांनी हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
? कलाकारांचे जीव ओतून सादरीकरण
अभिनय: मकरंद भास्कर सावंत (अप्पा), प्रतिकेश मोरे (गिधाड), ऋतुजा गद्रे
नृत्य: निहारिका भिडे, अवंतिका चौगुले, केतकी कुंभारे
गायन: वेदांत जाधव, तुलसी कोल्हे, गौरी डोंगरे
संगीत संयोजन: साहील परब
वादन: यश खडे, मानव वारंग
प्रकाश योजना: योगेश गोंधे
ध्वनी व्यवस्था: श्रेयस व टीम
वेशभूषा: डॉ. अभिषेक साटम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माधवी देवळेकर आणि कुणाल चव्हाण यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिले. संमेलनाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले.
या संमेलनामुळे गिधाड संवर्धनाच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळाली असून, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.
