नारायण तलावाची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची पाहणी
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 249 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी आज गुरुवारी सकाळी ८ वाजता चिपळूण शहरातील सुशोभीत करण्यात आलेल्या नारायण तलावाची पाहणी केली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली असून, तलाव परिसरातील विविध अडचणींवर त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या.
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नारायण तलावाचे काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. सध्या या परिसराचा वापर नागरिक सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी करीत असतात. मात्र काही ठिकाणी अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षिततेबाबत तक्रारी येत असल्याने नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत, कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी सर्व दिवे कार्यान्वित करावेत, तसेच पार्किंगजवळील परिसर स्वच्छ करून ग्रास कटिंग करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक त्या ठिकाणी नव्या झाडांची लागवड करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
या पाहणीदरम्यान उद्यान विभागाचे प्रमुख बापूसाहेब, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, विद्युत विभागाचे प्रमुख गणेश जंगम, नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेविका रसिका देवळेकर, पर्यावरणप्रेमी महेंद्र कासेकर, विश्वास पाटील, मॉर्निंग ग्रुपचे सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्षांशी थेट संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांच्या सूचनांची दखल घेत नारायण तलाव परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ व नागरिकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
