टीडब्लूजे कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

चिपळूण : शेअर बाजार गुंतवणुकीतून फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांनंतर अखेर टीडब्लूजे प्रा. लि. विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टीडब्लूजेचे संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर तसेच शाखा व्यवस्थापक यांच्यावर भा.न्या.सं. २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायदा १९९९ च्या कलम ४ अन्वये एफआयआर क्र. १३०६/२०२५ नोंदवण्यात आली असून, हा गुन्हा अवधूतवाडी पोलीस स्थानक, जि. यवतमाळ येथे दाखल करण्यात आला आहे.

२०१९ पासून टीडब्लूजे कंपनीने गुंतवणुकीवर हमखास व आकर्षक परताव्याचे आश्वासन देत निधी उभारला होता. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कंपनीने गुंतवणूकदारांना ना परतावा दिला, ना मूळ रक्कम परत केली. कंपनीचे संचालक समीर नार्वेकर यांनी सिंगापूरमधून गुंतवणूक येणार असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना खोट्या आशेवर ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.

या कंपनीत २३०० हून अधिक पोलीस कर्मचारी व अनेक उच्चपदस्थ शासकीय अधिकारी यांची गुंतवणूक असल्याचे स्वतः समीर नार्वेकर सांगत असे. त्यामुळेच राज्यातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल होऊनही पोलिसांकडून दखल घेतली जात नव्हती. अगदी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी शहरातील तक्रारींवर चौकशीही न झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, टीडब्लूजे कंपनीच्या राज्यभरातील १६ शाखांतील सर्व संचालक, ब्रांच मॅनेजर व बिझनेस पार्टनर्स यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख