सुभाष पाकळे फाउंडेशनतर्फे सावर्डेत भव्य रक्तदान शिबिर

सावर्डे (संदीप घाग) : जिल्ह्यातील वाढत्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डे यांच्या माध्यमातून आदरणीय आमदार शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उद्योजक सचिन पाकळे व संजय पाकळे यांच्या निवासस्थानी २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडले.

जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांच्या वतीने 'दान रक्ताचे, वाचवूया प्राण रुग्णाचे' असे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत सावर्डे येथील मुंबई-गोवा महामार्गावरील सचिन कात इंडस्ट्रीज येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.

शिबिराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर ढाकमोलीच्या सरपंच भारती लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी उद्योजक संजय पाकळे, उद्योजक सचिन पाकळे, शेखर निकम प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेश सावर्डेकर, सचिव देवराज गरगटे, उपाध्यक्ष उमेश राजेशिर्के, संतोष खैर, सावर्डे उपसरपंच जमीर मुल्लाजी, विजय भुवड, पूनम पाकळे, मेघा पाकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात पंचक्रोशीतील तब्बल ८१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत मोलाचे योगदान दिले. जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स तसेच तांत्रिक कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

रक्तदान शिबिर यशस्वी केल्याबद्दल जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी यांचे सचिन पाकळे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

संबंधित लेख